🔥 TRENDING ધમણાચા ગામમાં નદી પાર કરતી વખતે મગરનું... કાલાવડ તાલુકાના ખરેડી ગામમાં વડાપ્રધાન... *पलामू* - *सड़क दुर्घटनाओं पर डीसी ने... ફતેગઢમાં પીએમ મોદીનું જન્મદિવસ ઉત્સવ Delhi MPs Demand Shah Commission Repor... Special Court Seeks Red Corner Notice...
17 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

राजापूर तळगाव येथे गोवा बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा मद्यसाठा जप्त, दोन आरोपींना कोठडी

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 17 Sep 2026, 07:58 PM 👁 8
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजापूर तालुक्यातील तळगाव येथील हॉटेलच्या मागील खोलीत सुरू असलेल्या गोवा बनावट दारूच्या अवैध बॉटलिंग अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

राजापूर तालुक्यातील तळगाव येथे हॉटेल श्री स्वामी समर्थच्या मागील खोलीत सुरू असलेल्या गोवा बनावट दारूच्या अवैध बॉटलिंग अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने जोरदार छापा टाकला. या कारवाईत सुमारे १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींना राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी, सिंधुदुर्ग भरारी पथक आणि कणकवली विभागाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तळगाव येथील हॉटेल श्री स्वामी समर्थच्या मागील खोलीवर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान खोलीत लपवून ठेवलेले रॉयल ब्लू व्हिस्कीचे ५६ बॉक्स, दोन प्लास्टिक कॅनमध्ये ठेवलेले ६० लिटर तयार मद्य, तसेच अत्याधुनिक बॉटलिंग मशीन जप्त करण्यात आली. याशिवाय टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड मेन्शन हाऊस अशी छापील ८६ हजार ४०० बुचे, ओशियन रॉक प्रीमियम ग्रेन व्हिस्कीच्या लेबलचे रोल, ८६ हजार ४०० रिकाम्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, पाण्याच्या टाक्या आणि इतर बॉटलिंग साहित्यासह दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

या प्रकरणी जागेचा मालक दिनेश शांताराम जैतापकर (रा. तळगाव, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आणि चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील (रा. कुट्टालिन, फ्रान्सिसवाडी, पणजी, गोवा) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना राजापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दोन्ही आरोपींना ५ दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

सदर धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास भरारी पथक रत्नागिरीचे निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत. तसेच जिल्ह्यात कोठेही अशा प्रकारे अवैध दारूची निर्मिती, वाहतूक अथवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📲Get App