🔥 TRENDING સાવર કુંડલામાં ભારે વરસાદ પડ્યો Great Barbet suffers seizure, leaves c... Nagaland's Quest for Peace Through Dev... Madhya Pradesh Lokayukta clamps down o... Patwaris in Mandla Protest Against SDM... Congress' Anil Mittal vs BJP's Vineet...
18 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे फोटो महिनाभर मनपा मुख्यालयातील ‘Wall of Fame’ फलकावर झळकणार

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 18 Sep 2026, 10:22 PM 👁 19
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव करण्यासाठी ‘WALL OF FAME – उत्कृष्टता सन्मान’ हा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी सुरू केला आहे. महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये नागरिकांना अत्यावश्यक व नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कार्याची सार्वजनिक पातळीवर दखल घेतली जावी आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने दर महिन्याला निवडक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे छायाचित्र महिनाभर मनपा मुख्यालयातील ‘WALL OF FAME’ फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. “प्रामाणिक सेवा हीच देशसेवा” — आयुक्त संजीता महापात्र यावेळी बोलताना आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या की, “महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी हे नागरिकांना विविध सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. प्रत्येक पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने केलेली सेवा ही देशसेवाच आहे. देशसेवेसाठी ज्याप्रमाणे सीमेवर जवान आपले कर्तव्य बजावतात, त्याचप्रमाणे नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाही महत्त्वाची आहे.” “अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्यातून इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल,” असेही आयुक्तांनी नमूद केले. ‘WALL OF FAME – उत्कृष्टता सन्मान’ या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना ‘WALL OF FAME – उत्कृष्टता सन्मान’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. या महिन्यात विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळातील कर्तव्यनिष्ठ सेवा, प्रामाणिकपणा, विशेष परिस्थितीत केलेले काम, अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्याची तत्परता आणि नागरिकसेवेसाठी केलेले योगदान यांची दखल घेण्यात आली. यावेळी संभाजी रामचंद्र डांगे – वरिष्ठ लिपिक महापालिका कर (मालमत्ता कर व इतर) विभाग यांनी सन २००४ मध्ये महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर महसूल संकलनाचे काम प्रामाणिकपणे पार पाडले. सध्या अधिक्षकांना सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. निलम दीपक भोसले – परिचारिका/अधिपरिचारिका (स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ) या महापालिका रुग्णालय व्यवस्थापन विभागमध्ये सन २००० पासून स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून नागरी आरोग्य केंद्र, वानलेसवाडी हेल्थ पोस्ट, कुटुंब कल्याण सर्वेक्षण, साथरोग सर्वेक्षण तसेच कोविड काळातील लसीकरणासह शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. सध्या मिरज येथील महापालिका दवाखान्यात कार्यरत आहेत. श्रीकृष्णा आप्पा होनमोरे – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) हे महापालिका पाणीपुरवठा विभाग सन २००४ मध्ये महापालिका विद्युत विभागात रुजू झाले. क्षेत्रीय कार्यालय क्र. ३, कुपवाड येथून सेवेला सुरुवात करून त्यानंतर मिरज येथे कामकाज केले. सन २०२५ मध्ये पदोन्नतीने महापालिका पाणीपुरवठा विभागात कार्यरत असून पंप तसेच इतर उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पार पाडत आहेत. अविनाश भूपाल कांबळे हे सफाई कामगार महापालिका क्षेत्रीय कार्यालये सन २००२ मध्ये महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून रुजू झाले. महापूर, कोरोना तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये पूर्ण क्षमतेने कामकाज केले. सेवेत रुजू झाल्यापासून कर्तव्य बजावताना सातत्य व प्रामाणिकपणा कायम राखल्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली. तर डॉ सुचेता नरेंद्र पवार या वैद्यकीय अधिकारी या नात्याने महापालिका रुग्णालय व्यवस्थापन विभाग येथे दि. १८ जुलै २००१ रोजी वैद्यकीय सेवेत रुजू झाल्यापासून प्रामाणिकपणे सेवा बजावली. कोरोना काळ, महापूर तसेच इतर आव्हानात्मक परिस्थितींमध्ये आरोग्य विभागातील दवाखान्यांची यंत्रणा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामकाज केले. तसेच सिद्धाण्णा चंद्रशेखर पुजारी हे तारमार्ग तंत्री (लाईनमन) म्हणून महापालिका क्षेत्रीय कार्यालये दि. १ एप्रिल १९९३ रोजी सेवेत रुजू झाले. विद्युत विषयक कामकाजात दीर्घकाळ सेवा बजावत असून वरिष्ठांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिले आहेत. रविंद्र अरविंद भगत हे मेकॅनिकल कम गॅरेज इन्चार्ज महापालिका वाहन व यांत्रिकी विभाग येथे सन २००१ मध्ये महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाले. अत्यावश्यक सेवेसह महापालिकेच्या विविध वाहनांच्या दैनंदिन तपासणी, देखभाल, दुरुस्ती व पडताळणीसंबंधी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. आणि किशोर मल्लाप्पा धुळंबुळे हे शिपाई महापालिका अभियांत्रिकी प्रकल्प विभागामध्ये सन २००२ मध्ये महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाले. विभागाकडील विविध कामांमध्ये सातत्याने जबाबदारीने सहभाग घेत असून सोपविण्यात आलेली कामे कर्तव्यनिष्ठेने पार पाडत आहेत. गौरवातून निर्माण होणार सकारात्मक कार्यसंस्कृती महानगरपालिकेच्या सेवेत अनेक अधिकारी-कर्मचारी पडद्यामागे राहून नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करत असतात. त्यातील प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि विशेष योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य वेळी दखल घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, ‘WALL OF FAME’च्या माध्यमातून त्यांच्या कार्याला सन्मान, ओळख आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास मिळण्यासोबतच “आपल्या कामाची दखल घेतली जाते” ही भावना निर्माण होऊन इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही चांगले काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल. “काम प्रामाणिक असेल, तर सन्मान निश्चित!” “उत्कृष्ट कामाची दखल — उत्कृष्टतेचा गौरव!” यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, सहाय्यक आयुक्त अशोक माणकापुरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) विनायक जाधव, लेखाधिकारी किरण आनंदे, मुख्य सुरक्षा अधिकारी सुनील माळी, महिला व बाल विकास अधिकारी बाबासाहेब माळी, आस्थापना सहाय्यक अभिजित कांबळे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
📲Get App