🔥 TRENDING फत्तेपुर गावातील वारंवार वीजकटौतीमुळे... जैथरा थाना के पुरसारी गांव में कोबरा न... Ukhrul Times Highlights Need to Nurtur... Nagaland: More Than 11% of Voters Excl... Ludhiana Cleaning Staff Encircle Mayor... Jagga Singh Attempts Suicide After Pos...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वृद्धाश्रमांतील बेपत्ता असलेल्या प्रज्ञाचक्षू वृद्धाचा शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 21 Sep 2026, 12:50 PM 👁 11
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव, दि. २१ - शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट वृद्धाश्रमात राहणारे निर्मल लालचंद मोनानी (वय ५७, रा. सिंधी कॉलनी) हे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास आवार शिवारात एका शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल मोनानी हे प्रज्ञाचक्षू असून त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. दि. १४ सप्टेंबर रोजी ते कोणालाही न सांगता वृद्धाश्रमातून निघून गेले होते. आश्रम व्यवस्थापनाने त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ते मिळून न आल्याने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

बेपत्ता झाल्यानंतर दोन ते तीन दिवस ते आवार ते विदगाव गावादरम्यान रस्त्यावर फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी आवार शिवारातील रस्त्यालगत असलेल्या शेतात शेतकऱ्याला त्यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पायाच्या भागाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. मृतदेह उचलत असताना अवयव हातात येत होते, अशी विदारक परिस्थिती होती. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केला.

दरम्यान, मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने पोलिसांनी जागेवरच शवविच्छेदन करण्याची विनंती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना केली. मात्र डॉक्टरांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला, असा आरोप होत आहे.

या प्रकरणी तालुका पोलिस पुढील तपास करीत आहेत.
📲Get App