🔥 TRENDING సొనాలలో నూతన టీపీఎస్ స్కూల్‌కు రూ.11 క... समस्तीपुर: प्रखंड शिक्षा पदाधिकारी निर... सीकर में माकपा ने वार्ड नं 5 से राहुल... હુડકો ચોકડી પાસે ગાડી અથડાવી ને Gov. o... टोंक जिले में 28 ग्राम पंचायतों में अट... ગાંધીનગરમાં BJPએ 38 બેઠકો જીતી, કોંગ્ર...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
देशातील पहिल्या ‘कॅशलेस’ धसई गावात आता डिजिटल UPI चा बोलबाला; स्वाइप मशिन्सची जागा घेतली गुगल पे आणि फोन पे ने!
Technology

देशातील पहिल्या ‘कॅशलेस’ धसई गावात आता डिजिटल UPI चा बोलबाला; स्वाइप मशिन्सची जागा घेतली गुगल पे आणि फोन पे ने!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 13 Oct 2026, 03:05 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
देशातील पहिल्या ‘कॅशलेस’ धसई गावात आता डिजिटल UPI चा बोलबाला; स्वाइप मशिन्सची जागा घेतली गुगल पे आणि फोन पे ने!
• जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे
• तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड
• दिनांक: १४ ऑक्टोबर २०२६
मुरबाड:
नोटाबंदीच्या काळात देशातील पहिले ‘कॅशलेस गाव’ म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुरबाड तालुक्यातील धसई गावात आज एक नवा बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी कार्ड स्वाइप (PoS) मशिन्सद्वारे कॅशलेस क्रांतीची सुरुवात करणाऱ्या या गावात आता गुगल पे (Google Pay) आणि फोन पे (PhonePe) सारख्या मोबाईल UPI ॲप्सचे राज्य आले असून, जुन्या स्वाइप मशिन्स आता इतिहासजमा झाल्या आहेत.
सुरुवातीचा उत्साह आणि तांत्रिक अडचणी:
नोटाबंदीनंतर शासकीय आणि बँकांच्या पातळीवर धसई गावाला देशातील पहिले डिजिटल गाव बनवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. व्यापाऱ्यांना मोठ्या उत्साहात कार्ड स्वाइप मशिन्स वाटण्यात आल्या. मात्र, ग्रामीण भागातील संथ इंटरनेट सेवा, वारंवार खंडित होणारा मोबाईल नेटवर्कचा पुरवठा आणि नागरिकांमधील डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे काही काळानंतर हे मशिन्स वापरणे व्यापाऱ्यांना जिकिरीचे झाले. त्यातच बँकांकडून मशिन्सचे आकारले जाणारे मासिक भाडे न परवडणारे असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी पुन्हा रोख (कॅश) व्यवहारांचा रस्ता धरला होता.
UPI मुळे डिजिटल क्रांतीला मिळाली नवी गती:
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल पातकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला डेबिट कार्ड आणि स्वाइप मशिन्सवर अवलंबून असलेले नागरिक आता स्मार्टफोन आणि UPI तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. मोबाईलवरून थेट आणि विनाशुल्क पैसे ट्रान्सफर करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्याकडील जुन्या स्वाइप मशिन्स बँकांकडे जमा केल्या आहेत. आता भाजी विक्रेत्यांपासून ते मोठ्या दुकानदारांपर्यंत प्रत्येकजण गुगल पे आणि फोन पे चा सर्रास वापर करत असून, धसई गावातील डिजिटल व्यवहारांचा पाया अधिक मजबूत झाला आहे.
मूलभूत सुविधांची अजूनही गरज:
धसई हे परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र आहे. त्यामुळे येथील डिजिटल व्यवहार सुरळीत चालण्यासाठी ग्रामीण भागात दर्जेदार इंटरनेट सुविधा, अखंडित वीजपुरवठा आणि बँकिंग सेवा अधिक सक्षम करण्याची गरज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. धसई गावाची 'कॅशलेस' ही ओळख केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्षात यशस्वी ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि दूरसंचार कंपन्यांनी नेटवर्कच्या समस्या कायमच्या सोडवाव्यात, अशी मागणी व्यापारी आणि ग्राहकांकडून केली जात आहे..
📲Get App