🔥 TRENDING Tripura Congress warns proper polling... Congress Calls for Central Forces in T... Himachal Pradesh CM launches Sonia Gan... Himachal Pradesh reports over 4,600 va... Supreme Court orders Bhakra‑Beas power... सवाई माधोपुर *साढ़े सात फुट लंबा मतपत्...
17 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 17 Nov 2026, 12:05 AM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

९५ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईमुळे शिरूर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात!

एक लाखांची मागणी, तडजोडीनंतर ९५ हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप; एसीबीची कारवाई, न्यायालयाकडून पोलीस कोठडी

पुणे प्रतिनिधी | 17 नोव्हेंबर 2026

शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप संबंधित पोलीस हवालदारावर आहे. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईमुळे शिरूर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सतीश नाथराव मुंढे (वय ४५) यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारदाराविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी मुंढे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

३० सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी

तक्रारीच्या अनुषंगाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी मुंढे यांनी तक्रारदाराला शिरूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या टाकळी हाजी पोलीस चौकी येथे बोलावले. पंचांसमक्ष सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोड होऊन ९५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

एसीबीचा सापळा; ९५ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान मुंढे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, सापळा पथकाची चाहूल लागताच त्यांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम आणि तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता.

१६ नोव्हेंबर रोजी अखेर ताब्यात

या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि भारतीय न्याय संहिता कलम २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी सतीश नाथराव मुंढे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास हेटेकर यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी शिरूर नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करून शिरूर येथील विशेष न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले.

२० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

न्यायालयाने आरोपी मुंढे यांना २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, लाचेची रक्कम, घटनाक्रम आणि संबंधित कागदपत्रांबाबत तपास यंत्रणा अधिक माहिती घेत आहे.

या कारवाईचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुहास हेटेकर काम पाहत असून, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास सुरू आहे. तसेच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा कठोर संदेश गेला आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवरच लाच मागणीचे आरोप झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
📲Get App