🔥 TRENDING सिरोही में उप जिला प्रमुख बने लखमाराम... અમરેલીમાં સંવિધાન દિવસે ભવ્ય 'સંવિધાન... વિસનગરની સી.સી મહિલા આર્ટસ અને શેઠ સી.... एक दिन छात्राओं के हाथ मे ं महाविद्याल... MP NEET PG 2026: DME Releases Revised... Gadkari unveils Rs 1 lakh-cr Bengal pa...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरच्या प्राचार्यपदी डॉ. प्रशांत पवार

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 26 Nov 2026, 07:24 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरच्या प्राचार्यपदी डॉ. प्रशांत पवार

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राचार्यपदी डॉ. प्रशांत पवार
शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि सकारात्मक कार्यसंस्कृतीवर भर;
‘एसव्हीआयटी २.०’ च्या माध्यमातून संस्थेच्या विकासाचा संकल्प
सोलापूर: खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील अल्पावधीत नावारूपास आलेल्या एसव्हीआयटी तथा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य पदाचा पदभार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संशोधक डॉ. प्रशांत मारुती पवार यांनी नुकताच स्वीकारला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे, सचिव अशोक भोसले, उपाध्यक्ष एच. एम. बागल, खजिनदार बी. डी. रोंगे, विश्वस्त एस.टी.राऊत, विश्वस्त आर.बी.रिसवडकर व गव्हर्निंग बॉडीचे सदस्य डॉ. उल्हास शिउरकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य पदाचा पदभार देऊन तरुण संशोधक डॉ. प्रशांत पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लीना इंजिनिअरिंग वर्क्सचे सीईओ पळसुले, डॉ.प्रकाश साळुंखे, प्राध्यापक वर्ग, इतर सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. प्रशांत पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संशोधक म्हणून राज्यात स्वतंत्र ओळख असलेले डॉ. प्रशांत पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये पदवी पूर्ण करून पदव्युत्तर पदवी अर्थात एम.टेक हे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहाटी येथून पूर्ण केले तर भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), बेंगळुरू येथून पीएच.डी. ही मानाची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. दक्षिण कोरियातील कोनकुक विद्यापीठात त्यांनी संशोधक प्राध्यापक म्हणूनही कार्य केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा ‘विश्वेश्वरय्या सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ यांसह विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळलेली आहे. डॉ. पवार यांना अध्यापनासोबत संशोधन, शैक्षणिक प्रशासन आणि उद्योग-संस्था सहकार्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांच्या संशोधन कार्यात आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतील शोधनिबंध, नऊ पुस्तके आणि विविध पेटंट्सचा समावेश आहे, यांपैकी आठ पुस्तके स्प्रिंगर या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांनी पीएच.डी., तर २९ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पूल व संरचनांची सुरक्षितता, ग्रामीण तंत्रज्ञान आणि समाजोपयोगी अभियांत्रिकी उपाययोजना ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय यांच्या सहभागातून महाराष्ट्रातील स्मार्ट ड्रोन परिसंस्थेशी संबंधित सुमारे ३३.७३ कोटी रुपयांच्या संयुक्त प्रकल्पातही त्यांचा सहभाग आहे. याशिवाय भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने ग्रामीण तंत्रज्ञानाचा प्रसार, विविध संशोधन अनुदान प्रकल्प, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविलेले उपक्रम आणि अभियांत्रिकी सल्लागार सेवांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. संशोधनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योग आणि ग्रामीण समाजाच्या गरजांसाठी करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राध्यापकांशी संवाद साधताना डॉ. प्रशांत पवार यांनी संस्थेच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले तसेच शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, विद्यार्थी प्रवेश आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘एसव्हीआयटी २.०’ च्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्थेविषयी आत्मीयता बाळगून उपलब्ध क्षमतांचा प्रभावीपणे वापर करणे, मर्यादा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करणे आणि उत्साहाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सकारात्मक दृष्टिकोन, परस्पर सहकार्य आणि कामातील समाधान यांच्या आधारे सक्षम कार्यसंस्कृती घडविण्यावर आपला भर राहील. व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पदविका अभ्यासक्रमांच्या चांगल्या निकालांची परंपरा कायम राखत पदवी अभ्यासक्रमांची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी प्रवेश वाढविण्यासाठी नियोजनबद्ध धोरण राबविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी नमूद केले. अध्यापनातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा कौशल्यविकास आणि संशोधनाभिमुख वातावरण यांच्या माध्यमातून संस्थेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख बळकट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यवस्थापन मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.
📲Get App