🔥 TRENDING કેબીનેટ મંત્રી ભુપેન્દ્ર યાદવના હસ્તે... ಸಂಘಟನೆ–ಶಿಕ್ಷಣ–ಆರೋಗ್ಯ–ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಆದ್ಯತ... Himachal Educators Rally to Safeguard... Times Now Navbharat Survey: Dhami Gove... Chef Narendra Singh Launches Authentic... Uttarakhand CM Dhami Praises Modi, Hig...
14 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पारोळ्यात बैलपोळ्याला गालबोट : किरकोळ वादातून तरुणाचा खून, आरोपी फरार..!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 12 Sep 2026, 03:44 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

पारोळा (जळगाव) : सणाचा आनंद आणि उत्साहात असतानाच जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बैलपोळ्याच्या शुभ दिवशी केवळ बैलाला बैलाचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना मृत तरुणाच्या वडिलांच्या डोळ्यादेखत घडल्याने पळासखेडे बु. गावावर शोककळा पसरली आहे.

मयूर पाटीलचा वाटेतच मृत्यू

या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव मयूर बाळू उर्फ दुर्वास पाटील (वय १८, रा. पळासखेडे बु.) असे आहे. तो पारोळा येथील किसान महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. या प्रकरणी मयताचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश नेहरू पाटील याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान पळासखेडे बु. गावात बैलपोळा सणानिमित्त पोळा फोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम सुरू होता. मयूर आपल्या चुलत भावासोबत शेतातील काम आटोपून परतत असताना रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ दोन बैलांचा एकमेकांना धक्का लागला.

याच किरकोळ कारणावरून मयूर आणि संशयित आरोपी अंकुश पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाला जुन्या भांडणाचीही किनार होती. वाद वाढत असल्याचे पाहून मयूरचे वडील आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दोघांना समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र संतापाच्या भरात आरोपीने कोणाचेच न ऐकता खिशातील धारदार चाकू काढून मयूरच्या पोटावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्याने उपस्थितांना मोठा धक्का बसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयूरला ग्रामस्थांनी तातडीने दुचाकीवरून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जळगावला हलवण्यात येत असताना वाटेत एरंडोलजवळ त्याचा मृत्यू झाला.

आरोपी फरार, नातेवाईकांचा आक्रोश

घटनेनंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. पारोळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, आरोपीला तात्काळ अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने रुग्णालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती निवळली.
या घटनेमुळे एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे की, क्षणिक रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय दोन कुटुंबांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करतो. सणाच्या दिवशी घडलेली ही रक्तरंजित घटना समाजाच्या वाढत्या असहिष्णुतेचे विदारक चित्र समोर आणते.
📲Get App