🔥 TRENDING Delhi Tightens Security Ahead of INDIA... Plumber Arrested in Dehradun Triple Mu... Rahul Dravid says Virat Kohli’s mimicr... Madhuri Dixit Reunites with Amitabh Ba... Addinath Kothare lauds Yami Gautam’s d... ‘Phata Patakha’ song from ‘Nayyi Navel...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

पुण्यातील ग्रामदैवत आणि प्रसिद्ध श्री कसबा गणपती मंदिरात चोरीची धक्कादायक घटना

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 07 Oct 2026, 02:04 AM 👁 29
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मंदिर उघडताना चोरीचा प्रकार उघडकीस

पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात मोठी चोरी; चार दानपेट्या फोडून ५० ते ६० हजारांची रोकड लंपास

पुणे जिल्हा रिपोर्टर | ७ ऑक्टोबर २०२६

पुण्यातील ग्रामदैवत आणि प्रसिद्ध श्री कसबा गणपती मंदिरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या परिसरातील तब्बल चार दानपेट्या फोडून त्यातील अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंदिर उघडताना चोरीचा प्रकार उघडकीस

मंदिराचे विश्वस्त हेरंब ठकार हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी आले असता, मंदिराची कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. आत पाहणी केली असता मंदिर परिसरातील चार दानपेट्या फोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

१५ ते २० दिवसांची देणगीची रक्कम असल्याचा अंदाज

फोडण्यात आलेल्या दानपेट्या मागील सुमारे १५ ते २० दिवसांपासून उघडण्यात आलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेली मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार चोरीला गेलेली रक्कम ५० ते ६० हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम रक्कम मोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

सीसीटीव्ही असूनही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मंदिर परिसरात सुमारे २४ ते २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, त्यापैकी काही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरट्यांनी याच सुरक्षा त्रुटीचा फायदा घेतला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेमुळे मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

पुण्याच्या ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी झाल्याने भाविकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस तपासातून चोरट्यांचा माग कधी लागतो आणि चोरीची नेमकी रक्कम किती होती, हे स्पष्ट होणार आहे.
📲Get App