🔥 TRENDING एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही; रा... ग्रेटर नोएडा के टिगरी गोल चक्कर पर पैं... IMD Issues Heavy Rain Alerts and Thund... Kerala PG Homoeopathy 2026 Application... Telangana Man Arrested for Cheating Wo... Six vehicles damaged in chain collisio...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
एका महिन्यात कुटुंबातील तीन मृत्यू : वडील, चुलत भाऊ गेल्यानंतर शेतकऱ्याचा अपघाती अंत, शिरसोली गावावर शोककळा......!!!

एका महिन्यात कुटुंबातील तीन मृत्यू : वडील, चुलत भाऊ गेल्यानंतर शेतकऱ्याचा अपघाती अंत, शिरसोली गावावर शोककळा......!!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 Oct 2026, 10:04 AM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगर परिसरात गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीतील नादुरुस्त पाण्याची मोटार बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने ५० वर्षीय शेतकरी विश्वनाथ भिका ताडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, विश्वनाथ ताडे हे दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात कामासाठी गेले होते. विहिरीतून बिघडलेली मोटार बाहेर काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते थेट विहिरीत कोसळले. आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत ताडे यांना विहिरीबाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.

कुटुंबावर संकटांची मालिका, गावावर शोककळा

विश्वनाथ ताडे हे कुटुंबाचा मुख्य आधार होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी अविवाहित आहे.

या दुर्घटनेला अधिक वेदनादायी किनार अशी की, काही दिवसांपूर्वीच ताडे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चुलत भावाचेही दुःखद निधन झाले. या दोन धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच महिन्याभराच्या आत कुटुंबातील तिसऱ्या सदस्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकामागून एक घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे ताडे कुटुंबीयांसह संपूर्ण शिरसोली गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
📲Get App