🔥 TRENDING સાબરકાંઠા જિલ્લા પોલીસ હેડ ક્વાર્ટર ખા... ડભોઇમાં વડાપ્રધાન નરેન્દ્ર મોદીના રાષ્... कटोली में ट्रैक्टर ट्राली के डायल टूटन... હિંમતનગરમાં મેઘમહેરથી રસ્તાઓમાં પાણી ભ... Ancient 1,000‑Year‑Old Ganesh Idol on... Bhoramdeo Sugar Mill clinches National...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातातून काळवीट तस्करीचे भयावह रॅकेट उघड; रक्ताने भरलेली गोणी पाहून पोलिसही हादरले

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 15 Sep 2026, 03:22 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

धुळे-सोलापूर महामार्गावर दोन कारची धडक, एक कार चार वेळा पलटी; जखमी आरोपीच्या कारजवळ सापडले संरक्षित काळविटाचे मांस

छत्रपती संभाजीनगर - भरधाव वेगातील दोन कारच्या जोरदार धडकेत एका मोठ्या वन्यजीव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील एसआरपीएफ कॅम्प परिसरात, ग्रुप 14 आयआरबी बटालियन पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 02-एएल-8982 क्रमांकाची कार नियंत्रण सुटल्याने तब्बल चार वेळा उलटली. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे आणि राहुल रणवीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मुस्तफा अकबर कुरेशी (वय 24, रा. सातारा परिसर) हा जखमी अवस्थेत कारजवळ बसलेला आढळला.

चौकशीत मुस्तफा याने सांगितले की, कारमधील चालक शफिक सय्यद (32, रा. बुलढाणा), राजा शेख (45, रा. सुधाकरनगर) आणि असलाफ नूर कुरेशी (25, रा. आरेफ कॉलनी) हे त्याचे मित्र असून अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात गेले आहेत.

अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करताना पोलिसांना कारजवळ रक्ताने भरलेली एक गोणी दिसली. पोलिसांनी मुस्तफाला गोणी उघडून दाखवण्यास सांगितले. पोलिसांचा संशय आल्याचे लक्षात येताच मुस्तफाने महामार्गावरील गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

त्यानंतर पोलिसांनी गोणी उघडली असता त्यात संरक्षित वन्यजीव असलेल्या काळविटाचे मांस असल्याचे आढळून आले. गोणीमध्ये हरणाची कातडी मात्र आढळून आली नाही. काही तासांपूर्वीच या काळविटाची अवैध कत्तल करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांसाची रीतसर पाहणी करून नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त केले आहेत.

तपासादरम्यान अपघातग्रस्त कारचे भिवंडी कनेक्शनही समोर आले आहे. ही कार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका व्यक्तीच्या नावावर असून काही महिन्यांपूर्वी मुस्तफा याने ती खरेदी केली होती. वन्यजीवांची शिकार करून त्यांची तस्करी करण्यासाठी या वाहनाचा वापर केला जात होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

काळविटाच्या मांसाची तस्करी हा अत्यंत गंभीर असून, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणात मुस्तफा अकबर कुरेशी, शफिक सय्यद, राजा शेख आणि असलाफ नूर कुरेशी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातारा पोलिसांकडून सुरू आहे.

अपघातात जखमी झालेले तसेच घटनास्थळावरून पसार झालेले आरोपी सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, काळविटाची शिकार नेमकी कुठे करण्यात आली आणि मांस कुठे नेले जात होते, याचाही तपास आता पोलिस आणि वनविभागाकडून केला जात आहे.
📲Get App