🔥 ट्रेंडिंग चिचपल्लीजवळ NH-930 महामार्गावर ट्रक-डु... बिगुसारी में बस दुर्घटना की चेतावनी: व... Bhakta Kanakadasa Jayanti Celebrated i... भाजपा की दुर्गा कुंवर ने जालौर पंचायत... வேலூர் குடியாத்தம் நீதிமன்றம் முன்னால்... तापी काठी अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसू...
27 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

चौकीदारा कडून थकीत वेतनासाठी दोन हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक रंगेहात....!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 27 नव. 2026, 05:53 PM 👁 30
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

धुळे : चौकीदाराचे थकीत वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) करण्यात आली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील रामभाऊ खेडकर (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत आहेत.

तक्रारदार हे याच आश्रमशाळेत एप्रिल २०२६ पासून रोजंदारी तत्त्वावर चौकीदार म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या थकीत वेतनाची रक्कम प्रलंबित होती. त्याबाबत त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक खेडकर यांची भेट घेतली असता, खेडकर यांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी ८ हजार रुपये त्यांनी त्याचवेळी फोन-पे द्वारे स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या बँक खात्यात २२ हजार ८२५ रुपये थकीत वेतन जमा झाले. त्यानंतर उर्वरित २ हजार रुपये देण्यासाठी खेडकर यांनी तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची २५ नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी पंचांसमक्ष खेडकर यांनी उर्वरित २ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचून त्यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, उपनिरीक्षक सचिन साळुंखे, सहायक निरीक्षक राजन कदम, पोहेकॉ. मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, भारत तांगडे आदींच्या पथकाने केली. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
📲Get App