🔥 TRENDING Punjab transfers 20 IAS officers, name... સાબરકાંઠા જિલ્લાના પાટીદાર સમુદાયમાં દ... Assam Train Crash: Loco Pilot Warns of... एटा के थाना कोतवाली देहात में धोखाधड़ी... तमाड़ में पूर्व मुख्यमंत्री अर्जुन मुं... Sairang Express Derailed in Assam; Vid...
11 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! बेझे धरणात बुडून पित्यासह दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू

✍️ Reporter: प्रविण भाऊसाहेब पाटील 🗓 11 Nov 2026, 08:52 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दिवाळी सण दुःखाचा

भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! बेझे धरणात बुडून पित्यासह दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
त्र्यंबकेश्वर : भाऊबीजेच्या सणाचा आनंद सुरू असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे धरणात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. धरणात आंघोळीसाठी गेलेल्या पित्यासह त्याच्या दोन चिमुकल्या मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेत सुरेश नामदेव भोर (वय ४२), त्यांची मुलगी ज्योती (वय १०) आणि हर्षदा (वय ७), अशी मृतांची नावे असून ते सर्व वाघेरे, ता. इगतपुरी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर कुटुंब उत्तम चव्हाण यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर) सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान सुरेश भोर हे आपल्या दोन्ही मुलींसह बेझे धरणात आंघोळीसाठी गेले होते. मात्र, धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि पोहण्याचा सराव नसल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
सणाच्या आनंदावर दुःखाचा डोंगर!
भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा सण. अशा आनंदाच्या दिवशीच एका पित्याला आपल्या दोन लहान मुलींसह जीव गमवावा लागल्याने ही घटना मन हेलावून टाकणारी ठरली आहे. तीन निष्पाप जीवांच्या मृत्यूमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाघेरे परिसरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.
धरण, तलाव किंवा नदीत आंघोळीसाठी जाताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता पाण्यात उतरू नये. पोहता येत नसल्यास विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने करण्यात येत आहे.
📲Get App