🔥 TRENDING Woman Gang‑Raped in June Thrown Off Te... Bihar Unveils ₹1.21 Lakh Crore Industr... Woman Slapped After Objecting to Loud... Woman Slapped After Objecting to Loud... Bihar Observes Yam Dvitiya with Songs,... Indore’s Agricultural Markets Kick Off...
11 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

अंधारलेल्या स्मशानभूमीत पणत्यांचा प्रकाश; चिचोंडी बुद्रुकमध्ये सामाजिक संवेदनशीलतेचा अनोखा दीपोत्सवी उपक्रम!.

✍️ Reporter: प्रविण भाऊसाहेब पाटील 🗓 09 Nov 2026, 10:38 PM 👁 147
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

.

अंधारलेल्या स्मशानभूमीत पणत्यांचा प्रकाश; चिचोंडी बुद्रुकमध्ये सामाजिक संवेदनशीलतेचा अनोखा दीपोत्सवी उपक्रम!

नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
दीपावली म्हटली की घराघरांत रोषणाई, आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट आणि दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळतो. मात्र, ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी बुद्रुक–रायते येथे यंदा दीपावलीनिमित्त एक वेगळाच आणि समाजाला विचार करायला लावणारा उपक्रम राबविण्यात आला. गावातील स्मशानभूमीत आकर्षक रांगोळी काढून, फुलांची सजावट करून तसेच सुंदर पणत्या प्रज्वलित करून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला.
ग्रामपंचायत, महारुद्र तालीम सामाजिक संस्था आणि रोजगार हमी योजनेतील मजूर यांच्या संयुक्त सहभागातून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर परिसरात आकर्षक रांगोळी, फुलांच्या माळा आणि पणत्यांच्या प्रकाशाने सुंदर सजावट करण्यात आली. स्मशानभूमीच्या परिसरात पेटविलेल्या पणत्यांनी एक वेगळेच प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण झाले. अंधारात उजळणाऱ्या या पणत्या केवळ प्रकाश देणाऱ्या नव्हत्या, तर त्या सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सकारात्मक विचारांचा संदेश देणाऱ्या ठरल्या.
या उपक्रमात चांगदेव शिंदे, मेजर विवेक राजगुरू, प्रमोद घोटेकर, मेजर अनिल उबाळे, प्रकाश राजगुरू, श्रीहरी मढवई, गणेश सूर्यवंशी ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ मढवई, प्रविण पाटील, आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
स्मशानभूमीत पणत्या पेटविण्यामागील भावना ठरली विशेष!
स्मशानभूमी म्हटले की अनेकांच्या मनात भीती, शांतता आणि उदासीनतेची भावना निर्माण होते. मात्र, मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य असले तरी स्मशानभूमी ही गावाच्या सार्वजनिक व्यवस्थेचा आणि सामाजिक जाणीवेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या परिसराची स्वच्छता, देखभाल आणि सुशोभीकरण करणे हीसुद्धा आपली सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
दीपावलीचा प्रकाश केवळ घराच्या उंबरठ्यापुरता मर्यादित न ठेवता गावातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी पोहोचावा, तसेच दिवंगतांच्या स्मृतींप्रती आदर व्यक्त करत सामाजिक संवेदनशीलता जपली जावी, या सुंदर भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
एका पणतीचा प्रकाश अनेकांच्या मनात माणुसकीची ज्योत पेटवू शकतो, याची प्रचिती चिचोंडी बुद्रुक येथील या अनोख्या उपक्रमातून आली. गावाच्या विकासासोबत स्वच्छता, सामाजिक एकोपा आणि माणुसकीची जपणूक करणारा हा दीपोत्सवी उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
📲Get App