🔥 TRENDING Bengaluru: Masked Robbers Steal 117g G... MCC Bank Secures Best Performing Urban... Last UDAN Flights Depart from Shivamog... Tamil Nadu Announces 2nd VETTRI Invest... Ramayana Nears 'Manjummel Boys' and 'B... Tamil Nadu CM Vijay Attends Last Rites...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

अपमानजनक वागणूक आणि कमी मजुरीच्या निषेधार्थ आदिवासी शेतमजुरांचे सावर्णे येथे कामबंद आंदोलन शहापूर व मुरबाड तालुक्यातील शेकडो मजूर एकवटले; प्रतिदिन १,००० रुपये मजुरी आणि सन्मानाच्या वागणुकीची मागणी.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 20 Nov 2026, 04:05 PM 👁 36
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार
२१/११/२०२६.
शेत मुजरी विशेष वार्ता
मुरबाड ठाणे :प्रतिनिधी / सावर्णे
घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांकडून मिळणारी अपमानजनक वागणूक आणि वाढत्या महागाईच्या तुलनेत मिळणारा अपुरा मजुरीचा दर, याच्या निषेधार्थ शहापूर व मुरबाड तालुक्यातील विविध आदिवासी गाव-पाड्यांतील शेतमजुरांनी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सावर्णे येथे एकत्र येत तीव्र कामबंद आंदोलन पुकारले. सध्या मिळणारी ७०० रुपये मजुरी परवडत नसल्याने प्रतिदिन १,००० रुपये मजुरी मिळावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनामुळे परिसरातील शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांवरील शेकडो महिला व पुरुष शेतमजूर सकाळपासूनच सावर्णे येथे मोठ्या संख्येने जमा झाले होते. रोजंदारीवर शेतात राबणाऱ्या आदिवासी मजुरांना घाटमाथ्यावरील काही शेतकऱ्यांकडून योग्य सन्मान दिला जात नाही, तसेच सतत अपमानित केले जाते, असा गंभीर आरोप आंदोलक मजुरांनी यावेळी केला.
वाढत्या महागाईच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत दिवसभर कष्ट करूनही केवळ ७०० रुपये मजुरी मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. "आम्ही घाम गाळून प्रामाणिकपणे काम करतो, मात्र आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नाही आणि मजुरीही अत्यंत कमी दिली जाते. यापुढे हा अपमान आणि आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही," अशी संतप्त भावना आंदोलक मजुरांनी यावेळी व्यक्त केली.
सन्मानाची वागणूक मिळावी आणि मजुरीचा दर ७०० रुपयांवरून थेट १,००० रुपये करण्यात यावा, या मागण्यांवर मजूर ठाम आहेत. जोपर्यंत या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा निघत नाही, तोपर्यंत एकाही मजुराने कामावर जाऊ नये, असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला.
ऐन शेतीच्या महत्त्वाच्या हंगामात दोन्ही तालुक्यांतील आदिवासी मजुरांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे शेतीकामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधितांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मजुरांच्या मागण्यांवर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
📲Get App