🔥 TRENDING Senior Advocate Harish Salve Criticize... Pakistani Cricketer Reflects on Asian... India A to Face South Africa in Unoffi... Ajit Agarkar's Tenure as India Men’s C... Viewers Split: 'Enthralling' to 'Mixed... Merry Berry Love Release Date Announce...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अपघाताने फोडले गुटखा तस्करीचे बिंग ; मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणारी कार निंभोरा फाट्यावर पलटी, दोघे गंभीर.....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 08 Oct 2026, 06:42 AM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

रावेर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव कारला निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर कारची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित गुटखा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, MH 26 V 4423 क्रमांकाची चारचाकी गाडी बुऱ्हाणपूरहून रावेरमार्गे चोपड्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होती. निंभोरा फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाची नागरिकांनी पाहणी केली असता, त्यात महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा साठवलेला आढळला. त्यामुळे हा अपघात नसून गुटखा तस्करीचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

या घटनेमुळे बुऱ्हाणपूरहून रावेरमार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा तस्करी होत असल्याचा संशय बळावला आहे. सीमावर्ती भागातून होणाऱ्या या अवैध धंद्याचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करून या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App