🔥 TRENDING राष्ट्र भारतीय बसव दल के औरद तालुका अध... तृतीय चरण में आठ पंचायत समिति क्षेत्रो... ਚੋਣਾਂ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਗਠਜੋੜ 'ਤੇ ਸਸਪੈਂਸ, ਸੁਖ... मथुरा - यमुना एक्सप्रेसवे पर हादसा दो... Jailer 2 Tops Kerala Box Office for Th... ਮੁਲਾਜ਼ਮਾਂ ਨੂੰ ਦੀਵਾਲੀ ਦਾ ਵੱਡਾ ਤੋਹਫ਼ਾ, ਫ...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाविरोधात जळगावात बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; २ आणि ३ नोव्हेंबरला देशव्यापी काम बंद....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 02 Nov 2026, 04:52 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाविरोधात जळगावात बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; २ आणि ३ नोव्हेंबरला देशव्यापी काम बंद....!!

विभागीय प्रतिनिधी

जळगाव
आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करत बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २ आणि ३ नोव्हेंबर असे दोन दिवस देशव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, त्याचे पडसाद जळगावातही उमटले आहेत.

शहरातील काव्यरत्नावली चौकात बँक कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. बँकेतील हिस्सेदारी विदेशी कंपनीला विकण्याच्या प्रस्तावाला कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला.

बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून सर्वसामान्य ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेली सार्वजनिक सेवा आहे, त्यामुळे तिचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवणे गरजेचे असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. आयडीबीआय बँकेचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवावे आणि खासगीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

बँकेची मालकी आणि व्यवस्थापनातील सरकारी सहभाग कमी करून नियंत्रण खासगी क्षेत्राकडे देण्याच्या हालचालींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः विदेशी कंपनीला हिस्सेदारी विकण्याच्या प्रस्तावामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीची सुरक्षितता, वेतन आणि निवृत्तिवेतनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नोकरी, वेतन आणि पेन्शन यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची सरकार आणि बँक व्यवस्थापनाने हमी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, या आंदोलनानंतरही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या आंदोलनाचा परिणाम बँकेच्या नियमित कामकाजावर होण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना शाखांमधील आर्थिक व्यवहार, धनादेश, रोख रक्कम काढणे आणि इतर बँकिंग सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या महत्त्वाच्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन करून ठेवण्याची गरज आहे.
📲Get App