🔥 TRENDING Manipur Governor Inaugurates New Healt... Manipur High Court Declares Producing... Meghalaya Launches Digital Transport S... सीओ शाहाबाद देवकीनंदन ने किया थाना सैफ... Meghalaya Transfers Baljek Airport to... Meghalaya Cabinet Chooses Long‑Term Bo...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

दादर स्थानक होणार आता ‘चैत्यभूमी’!७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त २५ लाख अनुयायांच्या स्वागतासाठी शासन सज्ज; विधिमंडळ अधिवेशनात नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 18 Nov 2026, 10:52 PM 👁 52
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त २५ लाख अनुयायांच्या स्वागतासाठी शासन सज्ज; विधिमंडळ अधिवेशनात नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
मुंबई,ठाणे दि. १९/११/२०२६. (प्रतिनिधी) :विशेष महा निर्वाण दिन वार्ता पत्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसुविधांसाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली असून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात नामकरणाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक पार पडली. यंदा ५ व ६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात सुमारे २५ लाख अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता, मागील वर्षांच्या अनुभवातून राहिलेल्या त्रुटी दूर करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
चोख व्यवस्था आणि कडक नियमावली
अनुयायांसाठी निवारा, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा आणि शौचालयांची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य व गांभीर्य राखण्यासाठी या दिवशी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम टाळून प्रबोधनपर उपक्रम राबवावेत. तसेच, चैत्यभूमी परिसरात शांतता व शिस्त राखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मोर्चे, धरणे किंवा आंदोलनांवर गृह विभागाने अधिकृत बंदी जाहीर करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीत समन्वय समितीने मांडलेल्या सूचनांवर पुढील पाच ते सात दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशभरातून येणाऱ्या लाखों अनुयायांना सन्मानपूर्वक आणि सुलभ सेवा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. निवारा, भोजन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहता कामा नये. सुविधांमध्ये हयगय झाल्यास किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
इंदू मिल स्मारकाला निधीची कमतरता भासणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, पुतळ्याचे काही काम अंतिम टप्प्यात आहे. कामाचा खर्च वाढला तरी शासन त्याची भरपाई करेल आणि स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह वरिष्ठ सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
📲Get App