🔥 TRENDING हजारीबाग में संविधान दिवस पर डीसी हेमन... सिंगरौली के देवसर मार्केट में फिर से ठ... राजकीय महाविद्यालय खैरथल में फ्रेशर पा... एस डी मॉडल स्कूल समाना में संविधान दिव... हजारीबाग पुलिस ने 107 अभियुक्तों का भौ... हजारीबाग के एसपी अमन कुमार ने पुलिस कर...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पिंपळगाव जलाल येथे RCRC सर्व्हेतून ग्रामीण महिलांच्या अपेक्षा आणि कौशल्यांचा अभ्यास

✍️ Reporter: प्रविण भाऊसाहेब पाटील 🗓 26 Nov 2026, 05:01 PM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ता. येवला येथील पिंपळगाव जलाल येथे RCRC (SAH ANUSANDHAN SURVEY) अंतर्गत १८ ते ३० वयोगटातील महिलांचा सर्व्हे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. रिटू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे सुरू आहे.

ता. येवला येथील ग्रामपंचायत पिंपळगाव जलाल येथे RCRC (SAH ANUSANDHAN SURVEY) अंतर्गत १८ ते ३० वयोगटातील निवड झालेल्या महिलांचा सर्व्हे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांचे दैनंदिन जीवन, त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, कामाचे स्वरूप, कौशल्ये, अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील संधी यांची माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

ग्रामीण भागातील महिला पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत तब्बल ८ ते १० तास विविध कामांमध्ये व्यस्त असतात. शेतीची कामे, घरातील स्वयंपाक व इतर जबाबदाऱ्या, गाय, शेळी, मेंढीपालन, शिवणकाम, विणकाम तसेच मजुरीची कामे अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. अनेकदा या कामांचा आर्थिक मोबदला मिळतो, तर काही कामे विनामोबदला केली जातात. याशिवाय घरातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची काळजी, वृद्ध सासू-सासरे, आई-वडील यांची जबाबदारीही महिला समर्थपणे सांभाळतात.

एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना महिलांना स्वतःच्या शिक्षणासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी, सामाजिक संवादासाठी आणि नवीन संधी शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. बँकेचे व्यवहार समजून घेणे, ऑनलाइन कामकाजाची माहिती मिळवणे, आर्थिक व्यवहारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, सामान्य ज्ञान वाढवणे तसेच स्वतःच्या कौशल्यांना योग्य दिशा देणे या बाबींसाठी त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर RCRC SAH ANUSANDHAN SURVEY च्या माध्यमातून महिलांचे विचार, अनुभव, दैनंदिन कामकाज, कौशल्ये, गरजा आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पिंपळगाव जलाल येथे सर्व्हे प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शक रिटू मॅडम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व्हे टीमला मार्गदर्शन केले. महिलांना प्रश्नावलीतील प्रश्नांचा उद्देश सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आला. त्यामुळे महिलांनी कोणताही संकोच न बाळगता मोकळेपणाने आपले विचार आणि माहिती मांडली. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील महिलांपर्यंत प्रत्यक्ष त्यांच्या गावात जाऊन त्यांची विचारपूस करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या उपक्रमाचे महिलांनी मनापासून स्वागत केले.

या सर्व्हे उपक्रमात रिटू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती अभियान नाशिकचे प्रविण पाटील, राहुल मढवई, इशांत जाधव आणि किरण अंबवले यांनी सहभाग घेतला. RCRC SAH ANUSANDHAN SURVEY टीमच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्येही हा सर्व्हे राबविण्यात येत आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सर्व्हेबद्दलचा उत्साह हीच या उपक्रमाची खरी पावती ठरली.
📲Get App