🔥 TRENDING Congress leader Kharge says Uttar Prad... કાવઠ પાટીયા શાળામાં બાળકો માટે જમણવારન... Lower Suktel Oustees Protest in Balang... Odisha Village Faces Identity Crisis:... 164 Foreign Nationals Freed from Fake... 32 Contract Employees Protest Outside...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मोकाट गुरांचा उच्छाद : ७८ वर्षीय वृद्धेला १० फूट उंच उचलून फेकले....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 26 Nov 2026, 08:19 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

लोहारा ता. पाचोरा येथील शनिवारच्या साप्ताहिक बाजारात मोकाट गुरांच्या उच्छादाने पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे. खरेदीसाठी आलेल्या ७८ वर्षीय वृद्ध महिलेला मोकाट गुरांच्या कळपातील एका गुराने जोरदार धडक देत तब्बल १० ते १५ फूट उंच उचलून फेकले. या घटनेत महिला डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या डोक्याला आठ टाके घालावे लागले आहेत.

रामेश्वर तांडा येथील कलाबाई सरीचंद राठोड असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. शनिवारी त्या बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. त्याचवेळी हिरव्या पालेभाज्यांच्या आकर्षणाने बाजारात फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या कळपाने त्यांना धडक दिली. धडकेनंतर त्या मागील बाजूस डोक्यावर पडल्या. डोक्याला मोठी जखम झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचारासाठी ३५ हजारांचा खर्च, तरीही उपचार अपूर्णच

जखमी कलाबाई यांच्यावर प्रथम लोहारा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना पुढील उपचारांसाठी पाचोरा येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे सुमारे २० हजार रुपये खर्च आला. दुसऱ्या दिवशी त्रास वाढू लागल्याने त्यांना जळगाव येथील डॉ. राजेश धाबी यांच्याकडे नेण्यात आले. मात्र, कुटुंबाची आर्थिक तरतूद संपल्याने अपूर्ण उपचारावरच त्यांना घरी आणावे लागले. या घटनेमुळे राठोड कुटुंबाला जवळपास ३५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

योगायोगाने त्यांचा लहान मुलगा आपल्या नातवंडांना उपचारासाठी लोहारा येथील रुग्णालयात घेऊन आला होता. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच त्याने तातडीने धाव घेत आईला रुग्णालयात दाखल केले.

प्रमुख बाजारपेठेतही प्रशासनाचे दुर्लक्ष

लोहारा ही परिसरातील प्रमुख साप्ताहिक बाजारपेठ आहे. दर शनिवारी येथे मोठी गर्दी असते. रोटवदतांडा, रोटवद, नांद्राप्रलो, नाचनखेडा, एकुलती, कासमपुरा, शाहापुरा, कळमसरा, म्हसास, रामेश्वर तांडा आणि लाखतांडा आदी गावांमधून विक्रेते व ग्राहक येथे येतात. परिसरात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असल्याने ताजा भाजीपाला, दैनंदिन स्वयंपाकाचे साहित्य व गृहपयोगी वस्तू योग्य दरात मिळतात. त्यामुळे बाजारात नेहमीच गर्दी असते.

मात्र, याच गर्दीच्या बाजारात हिरव्या पालेभाज्यांमुळे मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. भाजीपाला विक्रेत्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या गुरांचा त्रास सहन करावा लागतो. कोणताही दोष नसताना मोकाट गुरांमुळे एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत सहन करावी लागली आहे.

प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी

बाजारात मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बाजारात येणारे विक्रेते आणि ग्राहक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
📲Get App