🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात टपरीधारकांचा एल्गार! आधी पर्यायी जागा द्या, मगच टपऱ्या हटवा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा!

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 14 Nov 2026, 01:38 AM 👁 98
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रस्ते विकासकामांना विरोध नाही; मात्र वर्षानुवर्षे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना बेघर करू नका! १३ नोव्हेंबरच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार होती.

लोणावळा : शहरातील रस्ते विकासकामांच्या पार्श्वभूमीवर टपऱ्या आणि हातगाड्या हटविण्याच्या कारवाईचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. या कारवाईमुळे लोणावळ्यातील टपरीधारक आणि पथविक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या रोजगाराच्या संरक्षणासाठी व्यावसायिकांनी एकजूट दाखवत प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली आहे.

'विकासकामांना आमचा विरोध नाही, मात्र आमच्या पोटावर पाय देऊ नका!' अशी भूमिका घेत टपरीधारकांनी आधी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतरच टपऱ्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. वर्षानुवर्षे छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचा रोजगार अचानक हिरावून घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.

नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आणि नगरपालिकेकडे अधिकृत नोंद असलेल्या जुन्या टपऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र, नव्याने टाकलेल्या तसेच नगरपरिषदेच्या नोंदीत नसलेल्या टपऱ्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार आहे.

या भूमिकेमुळे जुन्या नोंदणीकृत टपरीधारकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी नोंदणीकृत पथविक्रेत्यांना ओळखपत्रे, विक्री प्रमाणपत्रे आणि पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न अद्याप कायम आहे.

शहरात हॉकर्स प्लाझा आणि हॉकर्स झोन तयार करून पथविक्रेत्यांचे योग्य पुनर्वसन करावे. बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांना ओळखपत्रे आणि विक्री प्रमाणपत्रांचे वाटप करावे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह छोट्या टपऱ्या आणि हातगाड्यांवरील व्यवसायावर अवलंबून आहे. अचानक होणाऱ्या कारवाईमुळे या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी लक्ष घालून हस्तक्षेप करावा, अशी मागणीही टपरीधारकांकडून करण्यात आली आहे. ही कारवाई नेमकी कोणत्या दबावाखाली सुरू आहे, असा सवाल उपस्थित करत व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्ही मतदान करून चूक केली आहे का?' असा संतप्त सवालही काही व्यावसायिकांकडून उपस्थित करण्यात आला.

या प्रश्नावर पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी लोणावळ्यातील टपरीधारक, हातगाडीधारक आणि पथविक्रेत्यांची बैठक शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गॅटेज हॉटेल, गवळीवाडा शाळेजवळ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व संबंधित व्यावसायिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या बैठकीत टपरीधारकांची पुढील भूमिका, प्रशासनाकडे मांडावयाच्या मागण्या आणि आंदोलनाची दिशा निश्चित करण्याबाबत चर्चा अपेक्षित होती.

विकासकामे झालीच पाहिजेत, शहराचा चेहरामोहरा बदललाच पाहिजे; मात्र त्या विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिकांच्या संसारावर कुऱ्हाड कोसळता कामा नये. प्रशासनाने विकास आणि रोजगार यांचा समतोल साधत पर्यायी जागा व पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, हीच टपरीधारकांची प्रमुख अपेक्षा आहे.

आता या प्रश्नावर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि टपरीधारक यांच्यात काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण लोणावळेकरांचे लक्ष लागले आहे.
📲Get App