🔥 TRENDING পুরুলিয়ার বেলডি ব্রিজে নদী থেকে স্বয়... ਬਠਿੰਡਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਪਲਸ ਪੋਲੀਓ ਮੁਹਿੰਮ ਦ... Pregnant Minor’s Complaint Sparks Arre... Kerala Teen Suffers Kidney Damage Afte... Kerala Sets Up Expert Panel to Bridge... Shashi Tharoor Calls for End to Kerala...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात मनसेच्या मावळ तालुकाध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी! अशोक कुटे यांना फोनवरून शिवीगाळ अन् जीवे मारण्याचा इशारा; लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ!

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 24 Nov 2026, 05:48 PM 👁 28
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळ्यात मनसेच्या मावळ तालुकाध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी! अशोक कुटे यांना फोनवरून शिवीगाळ अन् जीवे मारण्याचा इशारा; लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ!

लोणावळा व मावळ तालुक्यातील अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक वसंत कुटे यांनाच आता जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोणावळा आणि मावळ तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुटे हे मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरासह संपूर्ण मावळ तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत आहेत. अवैध व्यवसाय, अमली पदार्थांची खरेदी-विक्री यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी वारंवार भूमिका मांडत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात मावळ तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देऊन अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.

दरम्यान, मावळ तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आपल्याला धमकी देण्यात आल्याचा आरोप अशोक कुटे यांनी तक्रारीत केला आहे.

सोमवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास अशोक कुटे यांना फोनवरून शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली. तक्रारीनुसार, धमकी देणारे युवक मावळ तालुक्यातील असून, एकाच फोनवरून तीन जण त्यांच्याशी बोलत असताना मागून इतरांचाही आवाज ऐकू येत होता. या प्रकारामुळे कुटे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या घटनेची माहिती मिळताच मनसेचे मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांचीही कार्यकर्त्यांनी सामूहिक भेट घेत या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी अशोक कुटे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून धमकी देणाऱ्यांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच धमक्या मिळत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी अन्यायाविरोधात दाद कोणाकडे मागायची? असा सवाल आता या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे मोठे आव्हान लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
📲Get App