🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

खाकी वर्दीला लाचेचा डाग! लोणावळ्यातील पोलीस उपनिरीक्षक ACBच्या सापळ्यात; ३० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 17 Nov 2026, 07:48 PM 👁 47
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यात! गुन्ह्याची कलमे कमी करून जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी; ३० हजार रुपये स्वीकारताना फूड कोर्ट परिसरात रंगेहात अटक!

लोणावळा : लोणावळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे! गुन्ह्याच्या तपासात मदत करणे, गुन्ह्यातील कलमे कमी करणे तसेच जामीन मिळवण्यासाठी अनुकूल मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहात पकडले आहे. लोणावळ्यातील फूड कोर्ट परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नाथा रामकिसन केकाण (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, ते लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात मदत करणे, गुन्ह्यातील कलमे कमी करणे तसेच जामीन मिळवण्यासाठी अनुकूल मदत करण्याच्या मोबदल्यात केकाण यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १ लाख ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे ACBच्या माहितीत नमूद आहे. त्यानंतर यातील काही रक्कम स्वीकारण्यात आल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्ह्याचे दोषारोपपत्र (चार्जशीट) लवकर न्यायालयात पाठविण्यासाठी त्यांनी पुन्हा ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ३० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार ACBच्या पथकाने लोणावळ्यातील फूड कोर्ट परिसरात सापळा रचला. यावेळी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे.

या पथकाने केली कारवाई

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळखे, पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे तसेच पोलीस हवालदार वनिता गोरे, दगडू सोनवणे आणि पोलीस अंमलदार रवी दिवेकर यांच्या पथकाने केली.

लाच मागितल्यास ACBशी संपर्क साधण्याचे आवाहन

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोणावळ्यातील पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
📲Get App