🔥 TRENDING తణుకు మున్సిపల్ ఎన్నికల్లో మహిళా ఓటర్ల... తణుకు మున్సిపల్ ఎన్నికలలో 64.02% ఓటర్ల... ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅಬ್ಬರದ ಭಾ... 🚔ਨਵੇਂ ਐਸ.ਐਸ.ਪੀ. ਤਰਨ ਤਾਰਨ ਵੱਲੋਂ ਪ੍ਰੈੱਸ... Ruturaj Gaikwad Misses Maharashtra SMA... BRS Gains Momentum in Telangana as Lok...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

कुऱ्हा पानाचे येथील रस्ता रोको आंदोलनाला यश; प्रशासनाकडून लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात...!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 26 Nov 2026, 08:17 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

कुऱ्हा पानाचे ता.भुसावळ येथील रखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

एस.एच. ४४ महामार्गावरील किमी ५८/०० ते ६०/०० या टप्प्यातील काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत होते. ठेकेदाराने काम सुरू करून मध्येच बंद केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते.

याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार दि. २५ रोजी सकाळी बोदवड चौफुलीवर रस्ता रोको करण्यात आला.

आंदोलन सुरू होताच पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी सुरुवातीपासूनच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मध्यस्थी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून कामाला तात्काळ सुरुवात केली.

यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनासमोर थेट प्रश्न उपस्थित केले. मंजूर काम पूर्ण का झाले नाही? काम सुरू करून पुन्हा बंद का ठेवले? दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का नाही? आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष काम सुरू करून दाखवावे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच ठेकेदारावर कारवाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात योगेश पाटील, अतुल पाटील, श्रीकांत बरकले, किशोर रोनखेडे यांच्यासह कुऱ्हा पानाचे येथील समस्त ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती श्रीकांत बरकले व सहकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
📲Get App