🔥 ट्रेंडिंग காரைக்குடி புறநகர் பகுதியில் பாலம் அமை... सरदारशहर पंचायत समिति में 'किंगमेकर' ब... परशदेपुर चौकी इंचार्ज मोहित शर्मा ने ठ... किला चौक में स्कॉर्पियो चेकिंग के दौरा... SPECIAL CAMPAIGN TO BEGIN TOMORROW AT... बेलूपुर पुलिस ने गैंगस्टर एक्ट के तहत...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

ज्येष्ठ तमाशा कलावंत कमळाबाई चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा; रामदास राऊत यांनी घेतली सदिच्छा भेट

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 17 नव. 2026, 02:57 PM 👁 100
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वयाच्या १२व्या वर्षी तमाशाच्या फडात पदार्पण; ४३ वर्षांच्या कलासेवेतून उलगडला जुन्या तमाशाचा संघर्षमय इतिहास!

वयाच्या १२व्या वर्षी तमाशाच्या फडात पदार्पण; ४३ वर्षांच्या कलासेवेतून उलगडला जुन्या तमाशाचा संघर्षमय इतिहास!

ज्येष्ठ तमाशा कलावंत कमळाबाई चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा; रामदास राऊत यांनी घेतली सदिच्छा भेट

शिरूर प्रतिनिधी 17 नोव्हेंबर 2026

महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू असलेल्या तमाशा कलेचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कमळाबाई दत्तोबा चव्हाण सविंदणेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासातील संघर्ष, आठवणी आणि अनुभवांना नुकताच उजाळा दिला. वयाच्या अवघ्या १२ ते १३ व्या वर्षी तमाशाच्या फडात प्रवेश करून तब्बल चार दशकांहून अधिक काळ लोककलेची सेवा करणाऱ्या कमळाबाई यांच्या आठवणींमधून जुन्या तमाशा संस्कृतीचा इतिहास पुन्हा एकदा समोर आला.

तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत शिरूर यांनी सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सविंदणे (ता. शिरूर, जि. पुणे येथे कमळाबाई यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या कलाप्रवासाविषयी संवाद साधला. या भेटीत कमळाबाईंनी जुन्या तमाशाच्या आठवणी सांगताना त्या काळातील कलाकारांचे कष्ट, परिस्थिती आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांचे चित्र उभे केले.

बैलगाडीतून गावोगावी तमाशाचे प्रयोग!

पूर्वीच्या काळात तमाशाचे प्रयोग बैलगाडीतून गावोगावी नेले जात असत. प्रवासातील अडचणी, राहण्याची गैरसोय आणि साध्या जेवणावर समाधान मानत कलाकार आपली कला सादर करत असत. गावातील मंडळी कलाकारांच्या जेवणाची व्यवस्था करत. बेसन आणि भाकरी असे साधे जेवण करून कलाकार पुन्हा तमाशाच्या फडात रंगत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तमाशा कलेची सेवा करण्याचा आनंद वेगळाच होता, अशी आठवण कमळाबाईंनी सांगितली.

चंद्रकांत ढवळपुरीकर ते रघुभाऊ खेडकर यांच्या फडापर्यंतचा प्रवास!

आपल्या कलाप्रवासात चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशा मंडळात तब्बल आठ वर्षे काम केल्याचे त्यांनी सांगितले. या काळात गवळण, गायन, बतावणी तसेच वगनाट्यात विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर रघुभाऊ खेडकर यांच्या तमाशा मंडळात सलग ३५ वर्षे काम केल्याचा प्रदीर्घ अनुभवही त्यांनी कथन केला.

कांताबाई सातारकर यांच्या मुली लहान असल्यापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्याला नेहमीच घरातील व्यक्तीप्रमाणे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दिली. त्यांच्या या प्रेमाची आणि सहकार्याची आठवण आजही मनात कायम आहे, अशा भावना कमळाबाईंनी व्यक्त केल्या.

कलावंतांच्या अडचणींसाठी मदतीचा हात देण्याची ग्वाही!

यावेळी तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत यांनी कमळाबाईंना कोणतीही तांत्रिक अथवा वैयक्तिक अडचण उद्भवल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा. शक्य ते सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.

या भेटीबद्दल कमळाबाई चव्हाण यांनी रामदास राऊत यांचे आभार मानले. तसेच तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी रामदास राऊत यांच्यासमवेत शिरूर येथील मान्यवर पत्रकार मल्लाव, ज्येष्ठ स्नेही मनोहर शिंदे तसेच सविंदणे येथील स्थानिक स्नेही बाळासाहेब नेवकर उपस्थित होते.

जुन्या तमाशाचा इतिहास केवळ मनोरंजनाचा नसून तो संघर्ष, समर्पण, जिद्द आणि लोककलेवरील निस्सीम प्रेमाचा इतिहास आहे. कमळाबाई चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांच्या अनुभवांचे जतन होणे ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेसाठी महत्त्वाची बाब आहे.
📲Get App