🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भोर तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 17 Nov 2026, 02:22 AM 👁 92
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पुणे जिल्ह्याच्या भोर शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी चौकाचौकात आणि वाड्या-वस्त्यांवर शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

यंदा नोव्हेंबर महिन्यातच थंडीने जोर धरल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. तापमानात सातत्याने घट होत असल्याने पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना कठीण होत आहे. शेतकरी, शेतमजूर, दूध व्यावसायिक तसेच सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या थंडीचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच डोंगराळ भाग असलेल्या भोर तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. विशेषतः भाटघर आणि नीरा देवघर धरण परिसरातील गावांमध्ये गारठा अधिक जाणवत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच हवेत गारवा निर्माण होत असल्याने बाजारपेठेतील वर्दळ लवकर कमी होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत थंड वारे वाहत असल्याने नागरिक उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत.

नोव्हेंबर महिन्यातच थंडीचा एवढा कडाका जाणवत असेल, तर दरवर्षी थंडीचा जोर वाढणाऱ्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वाढत्या थंडीचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच पशुधनावर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करावी. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

थंडीचा कडाका वाढत असल्याने यंदाचा हिवाळा नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App